Friday, 21 June 2019

रेडियो कॉमेंट्री.. एक हृद्य आठवण..!

जेंव्हा टिव्ही नव्हते.. रेडिओ वरची "रनिंग काॅमेनटरी" हा एकमेव पर्याय होता त्या काळात आद्य समालोचकांपैकी एक कै. जसदेव सिंग, सुशील दोशी (हिंदी) तर अनंत सेटलवाड, सुरेश सरैय्या, प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी (इंग्रजी) तर काही प्रमाणात बाळ ज. पंडीत, बाळ करमरकर आणि वि. वि. करमरकर (मराठी) या समालोचकांनी आपापल्या भाषेतून समालोचन करत, क्रिकेट रसिकांच्या दोन पिढ्यांची भूक भागवली आहे. यातल्या प्रत्येकाची स्वतःची अशी विशिष्ठ शैली होती... खास अंदाज होता. "बोलर की जोsssरदार अपिsssल... लेकीन ये उत्साह में जादा.. विश्वास में कम..." असं म्हणताना श्वासात आरोह-अवरोह आणणारे सुशील दोशी, ऐकणाऱ्याचे प्राण कंठाशी आणायचे. जसदेव सिंग आणि समालोचन या खरंतर एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. हा या क्षेत्रातला खरा अवलिया म्हणायला हवा. यांनी क्रिकेट, हॉकी, फुटबॉलच नव्हे तर आॅलिंपिक्स, हॉकी वर्ल्ड कप्स, एशियाड, नॅशनल गेम्स असं प्रत्येकामध्ये समालोचन तर केलंच पण त्याशिवाय... १५ आॅगस्ट, २६ जानेवारीचे दिल्लीतले खास सोहळे ही गाजवले आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय महत्वाच्या नेत्यांच्या, व्यक्तींच्या अंतयात्रांच्याही समालोचनाची जबाबदारी अनेक दशकं त्यांनी अतिशय यशस्वीरीत्या पार पाडली. तर इंदोरचे थोड्याशा High Peach Tone असलेले सुरेश सरैय्या अतिशय रसाळ इंग्रजीत म्हणी, वाक्प्रचार वापरत रंगत वाढवायचे. अंनत सेटलवाड, प्रा. नाडकर्णी यांचा भरदार आवाज आणि खर्जातले उच्चार मन व्यापून टाकायचे. बाळ पंडितांनी ही मराठी समालोचक म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळवली होती..
"पुढचा चेंडू.. चांगल्या टप्प्यावरचा.. फलंदाज पाय पुढे टाकत मारण्याच्या प्रयत्नात.. पण तो हुकतोय.. पॅडवर बसतोय.. दाद मागण्यात आली आहे.. पण फलंदाज नाबाद..!" असं अगदी ओघवत्या शैलीत त्यांचं समालोचन असायचं. रेडिओ वर समालोचन असल्याने, साहजिकच खेळाच्या समालोचना सोबतच स्टेडियमवर असलेला माहौल ही वर्णनात असायचा. तिथलं दृश्य आपल्या शब्दांमधून ही मंडळी उभं करायची. फार मजा यायची... हे ऐकताना. आॅस्ट्रेलिया दौरा असला की, पहाटे तीनला उठून रेडिओला कान लावून बसायचं.. सुरवातीला खूप खरखर असायची.. मग हळूहळू आवाज स्पष्ट होत जायचा... आणि सुख मिळायचं. १९७७-७८ च्या आपल्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबोर्न कसोटीत पिटर टूही नावाच्या फलंदाजाचा, मदनलाल ने डीप फाईन लेग ला जवळजवळ तीस यार्ड्स धावत जाऊन घेतलेल्या झेलाचं जे वर्णन सुशील दोशींनी केलं होतं.. ते आजही मनात ताजं आहे...! अगदी डोळ्यासमोर घडल्यासारखं मी ते ऐकलं नाही तर.. पाहिलं होतं..! फार सुंदर काळ होता.. रेडिओ वरच्या काॅमेंट्रीचा..!

किती जणांच्या आठवणीत आहे हे..?

मदन देशमुख, पुणे.

2 comments:

  1. Good old Radio days...
    Lovely...

    ReplyDelete
  2. हो रे खरंच,आणि पॉकेट ट्रान्सजिस्टरच्या जमान्यात तर वेगळीच मजा, कित्येक जण अगदी कानाला लाउनच, आणि बाकीचे कुतूहल नजरेने त्या ट्रान्सजिस्टरवाल्याकडे पहात. एक वेगळीच मजा होती.

    ReplyDelete