सध्या चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत, पंचगिरी करणाऱ्यांच्या यादीत, भारताच्या एकमेव पंचाचा समावेश आहे.. ते म्हणजे श्री. एस रवि. हे सद्गृहस्थ तेच आहेत ज्यांच्या नजरेतून, आयपीएल स्पर्धेत (MI vs RCB) ऐन मोक्याच्या क्षणी, मलिंगाचा भला मोठा No Ball, सुटला होता. आणि मोठा गहजब उडाला होता.. पण यांच्या सदोष पंचगिरीवर काही कारवाई झाली नव्हती. ICC च्या "Elite Pannel", सांप्रत हे एकमेव भारतीय पंच आहेत. एके काळी चार-पाच भारतीय पंच या यादीत असायचे..! या घसरणीचं काय कारण असावं बरं?
माझा एका मित्राने पंचगिरीच्या परिक्षा दिल्या आहेत. त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक म्हणजे शहर पातळीवर, जिल्हा आणि राज्यस्तरीय आणि अखेर आंतरराष्ट्रीय पंच म्हणून पंचगिरी करणं (त्यासाठी असणाऱ्या विवीध परिक्षा, विविध स्तरीय प्रत्यक्ष सामन्यांमध्ये पंचगिरी, कार्यशाळा, व्याख्याने, mock drill इ. इ. आवश्यक बाबी पुर्ण करत ती अहर्ता मिळवणं, त्यात चांगली, उत्तम कामगिरी करून नाव कमावणं) हे एखाद्या क्रिकेट पटूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्द घडवण्या सारखंच कष्टाचं, जिकीरीचं आणि कठीण काम आहे. कौशल्य, एकाग्रता, काही प्रमाणात शारीरिक तंदुरुस्ती (विशेषतः डोळे आणि कानाची कार्यक्षमता) या सगळ्या गोष्टी पंचगिरी करताना अतिशय महत्वाच्या ठरतात. एका विशिष्ट पातळीनंतर इथे निवडीसाठी स्पर्धा असणारच. त्यातल्या गुणवत्ते सोबतच राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्यासाठी इतरही अनेक बाबी गुंतलेल्या असणारच हे सुज्ञास सांगणे नलगे..! हा माझा, हा तुझा, हा पुण्याचा, हा बाहेरचा, मग हा महाराष्ट्राचा, हा बंगालचा, हे समिकरण जसं जिल्हा पातळी पासून ते राज्य पातळीपर्यंत होणाऱ्या खेळाडूंच्या निवडीत वापरलं गेलेलं दिसतं... तसंच पंचगिरीच्या क्षेत्रातही ही असली डोंगराएवढी आव्हाने, या क्षेत्रातल्या लोकांसमोर असतात. आज बदललेल्या परिस्थितीत आणि अतिक्रिकेट च्या जमान्यात होणारे सामने त्यांची संख्या पाहता (विशेषतः अतिझटपट सामने लक्षात घेता), त्यात पुरस्कर्ते म्हणून उभे रहाणाऱ्या छोट्यामोठ्या कंपन्या, उद्योगी, व्यापारी यांची संख्या पाहता पंचांची सुद्धा मोठी गरज निर्माण झाली आहे. जवळपास प्रत्येक शहरात असे T—20 लीग सामने आता होतात. त्याची लोकप्रियता पाहता राज्य संघटनेकडून त्यावर नियंत्रण ठेवलं जात. पंच देखील अधिकृत म्हणजे जिल्हा क्रिकेट संघटनेचेच असणं बंधनकारक आहे. अशा वेळी चांगल्या उमेदवारांना या संधी देताना अपरिहार्यपणे, कधी चोरपावलाने तरी कधी "डंके की चोट पे", राजकारण प्रवेश करतं. राज्य संघटनांना विविध प्रशिक्षण कार्यक्रम, योजना राबवण्यासाठी भरपूर निधी, आर्थिक अनुदान आता भारतीय नियामक मंडळ देतं आहे. त्यातला "आपला वाटा" मिळवायच्या अहमहमिकेत अनेक लाजिरवाण्या घटना जिल्हा आणि राज्य संघटनांमध्ये घडतात. तीन - चार वर्षांपूर्वी गोवा क्रिकेट संघटनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात झालेली अटक हे याचंच उदाहरण..! असा अपहार झाल्यानंतर ज्या साठी ते अनुदान मिळतं त्या योजना कशा पुर्ण होतील? खेळाडू आणि पंच कसे तयार होतील? खेळाडूंच्या बाबतीत एकवेळ त्यांची कामगिरी मदत करेलच. पण पंचांच्या बाबतीत असं कधी काही ऐकू देखील येत नाही. एखादा पंच जो पर्यंत ICC च्या Elite Pannel मध्ये येत नाही तो पर्यंत आपल्याला माहितीही नसतो. भारतातल्या प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये कोण पंच असतात हेच माहिती नसतं तर त्या बरा कोण, वाईट कोणा आणि उत्तम कोण हे माहिती असणाऱ्याला "अंडं आधी की कोंबडी" या प्रश्नाचं उत्तर देखील माहिती असेल..! एखाद्या सामन्यात 150/200 च्या strike rate ने 20 चेंडूत 30-40 धावा काढणाऱ्या फलंदाजाचं कोण कौतुक होतं. तसंच काहीसं गोलंदाजांचं होतं... किवा एखाद्याने घेतलेल्या अफलातून झेलाचं..! (आजकाल असे झेल Powered By, Presented by and Sponsored by.... अशा धर्तीवर collaboration मध्ये घेतले जातात) आणि आपणही त्याचं कवन गात रहातो. पण त्याच सामन्यात पायचीत किंवा स्टंप्स च्या मागे, बॅटची अगदी बारीक कड घेऊन गेलेल्या झेलाच्या बाबतीत घेतल्या गेलेल्या अचूक निर्णयाच्या बाबतीत पंचाचं कधी कौतुक होताना दिसत नाही. उलटपक्षी एखादा निर्णय चुकल्यासारखं वाटलं किंवा दुर्देवाने तो चुकलाच तर मात्र त्याक्षणी पंचाचे वाभाडे काढले जातात. आता तर रेफरल सिस्टीम मुळे, पंचाचा निर्णय लगेच परीक्षा नळीत टाकून रासायनिक परीक्षण केल्यासारखं तपासलं जातं.. अन सिद्धता अन साध्य क्षणार्धात समोर मांडलं जातं. तो निर्णय बरोबर ठरला तर तेवढ्यापुरती चर्चा (झाली तर) होते. पण दुर्दैवाने जर तो चुकला तर संजय मांजरेकर सारखे खऊट शेंगदाणे दिवसभर बारीककुचाळ्यागत चिमटे काढत रहातात. एकूण मांडायचंय इतकंच की, Umpiring is a thankless job hounded by all but appreciated by none...! पंचगिरी हे क्रिकेट क्षेत्रातलं, एक अतिशय कौशल्याचं, अतिव श्रमाचं आणि तितकंच महत्वाचं काम असूनही त्याला योग्य आणि आवश्यक ते महत्व दिलं जात नाही. क्रिकेटपटूंना जेव्हा आता खेळून काही फायदा नाही अशी खात्री पटते तेंव्हा खेळताना मिळालेल्या अनुभवाच्या बळावर ते पंचगिरी करायला लागतात. याबाबतीत थोडी गंभीर झालेली मंडळी मग परिक्षा वगैरे देऊन पुढे जातात आणि सगळंच नीटपणे होत गेलं तर कुठेतरी पोचण्यात यशस्वी होतात. निवृत्त आंतरराष्ट्रीय खेळाडूंना इकडे वळणं बरंच सोपं जातं. त्यांची एक ओळखदेखील असतेच पण दबदबा सुद्धा मदतीला येतो. त्यांना वर उल्लेखलेल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं नाही. त्यामुळे त्यांची दुसरी इनिंग सुद्धा (कधी कधी पहिल्या पेक्षा जास्त) यशस्वी होते. व्यंकटराघवन, कुमार धर्मसेना, पाॅल रायफेल ही काही चांगली उदाहरणं आपल्या समोर आहेतच. प्रत्यक्ष पंचगिरी करतानाचे अनुभव, अडचणी हा एक वेगळाच विषय आहे. जमल्यास पुन्हा कधीतरी त्यावर लिहीनच..!
(सहज सुचलं म्हणून लिहीलं)
मदन देशमुख, पुणे.