Friday, 7 June 2019

पहिली माळ...विजयाची...!

तशी तर २०१९ ची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ३० मे २०१९ पासून सुरु झालीय. आणि कालपर्यंत नऊ सामने देखील पार पडले आहेत. कार्तिक महिन्यात पंढरपूर च्या जगविख्यात वारी साठी वैष्णवांचा मेळा, माउली आणि तुकोबारायाच्या पालख्या देहू-आळंदी हून ठराविक मुहूर्तावर प्रस्थान करतात खऱ्या... पण खरा रंग भरतो तो यांचं शुभागमन पुण्यनगरीत झाल्यानंतरच...! माउली आणि तुकोबारायाचं आगमन, त्यांचा एक दिवसाचा मुक्काम, वारकऱ्यांची सेवा, आणि नंतरच्या वाटचालीतला दिवे घाटापर्यंतचा पुणेकरांचा वारीतला सहभाग...या सगळ्याने तमाम मराठी माणसांच्या तना-मनावर जो एक भक्तिरंग चढतो तो थेट कार्तिकी एकादशी पर्यंत टिकून असतो. तसंच झालं विश्वचषकाच्या स्पर्धेचं देखील, कारण विश्वचषकाला देखील रंग चढला तो काल...भारताच्या, द.आफ्रीकेसोबतच्या झालेल्या सामन्याने...! कालची रमझान ईद ची सुट्टी आणि आपली पाहिला सामना...असा मस्त योग ही जुळून आला होता...त्यावर भारतीय संघाने आपल्या दमदार सांघिक कामगिरीने सर्वांना खुश करत या विश्वचषक मोहिमेला अपेक्षित आणि जोरदार प्रारंभ केला. उद्घाटना नंतर फार प्रतीक्षा करावी लागली खरं तर भारतीय खेळाडूंना आणि रसिकांना देखील...पण सुरवात उत्तम झाली हे समाधान नक्कीच आहे.
या स्पर्धेच्या आधीपासूनच, खरं तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून आपल्या धारदार गोलंदाजीने, त्यातल्या सातत्याने, पोत्याने घेतलेल्या बळींमुळे जसप्रीत भुमरा या पठ्ठ्याने जे काही नाव कमावलं आहे आणि स्वत:ची जी भिती आणि जो दरारा निर्माण केला आहे, तो वृथा नाही हे सिद्ध करणारा असाच होता त्याचा लाजवाब opening spell...! भुमरा चे काही चेंडू तर भन्नाटच होते... डी”कॉकच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यातून डोकावणारे खजील भाव, तो चारीमुंड्या चीत झाल्याचं साऱ्या जगाला सांगणारे.. कधीही होऊ घातलेला घात अखेर, भूमाराच्या लागोपाठच्या षटकातच झाला अन धोकादायक हशीम आमला आणि गुणी डी’कॉक तंबूत परत गेले. त्याने घेतलेल्या दोन बळींनी द. आफ्रिकेला सुरवातीलाच बकफूट वर ढकललं... दुधाने तोंड पोळलेले फलंदाज मग ताक देखील फुंकून प्यायला लागले.. अन भूवी आणि पांड्याने सुद्धा दुसऱ्या बाजूने धावा रोखून धरल्या...! संधी साधून विराट ने चहल आधी कुलदीप यादवला आणलं दुसऱ्या बाजूने पांड्या फारशा धावा न देता नियंत्रण ठेऊन होता. मग पांड्याच्या जागी आलेल्या युझवेन्द्र चहलने, स्थिरावू पाहणाऱ्या व्हेन डर ह्युसेन आणि नशिबाची साथ मिळत असलेल्या, द. आफ्रिकेचा आधारस्तंभ पाफ डू प्लेसीची बाळसं धरू पाहणारी भागीदारी तोडली. व्हेन डर ह्युसेन, चहलला रिव्हर्स स्वीप करायच्या प्रयत्नात आपलं हसू करून घेत बाद झाला. त्याला पडलेला लेग स्पिनर आधी dreeft होत लेग स्टंपच्या बाहेर गेला पण पडल्यावर झप्पकन वळला आणि थेट मधल्या स्टंप वर आदळला.. त्यावेळी ह्युसेन (हा उजव्या हाताचा फलंदाज) रिव्हर्स स्वीप च्या पावित्र्यात...! ज्यांनी सामना पाहिला त्यांना ते दृश्य आठवून पुन्हा हसू येईल..अन ज्यांनी नाही पहिला त्यांनी ते जरूर पहावं... भर पंगतीत गडबडीत उठताना, आपल्याच पायात आपल्या धोतराच्या निऱ्या अड्काव्यात आणि सर्वांसमोर लाज उघडी पडावी असा चेहरा घेऊन बिचारा परतला...!
हे कमी होतं की काय म्हणून त्याचं षटकात चहल ने एका चेंडूवर, अगदी कॉपी बुक शैलीत पाय पुढे टाकत बचावात्मक खेळणाऱ्या पाफ डू प्लेसीच्या bat & pad मधली बारीकशी फट शोधली अन तिथून आपला गुगली स्टंपात घुसवला... आणि आधीच गरिबीचे चटके झेलत रडत खडत चाललेला द. आफ्रिकेचा संसार अगदीच उघड्यावर पाडला. पाठोपाठ ड्यूमिनीही कोणाला काही त्रास न देता कुलदीपच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. नव्वदीतच निम्मा संघ तंबूत परतल्यावर द. आफ्रिका दीडशेचा आकडा तरी पार करते की नाही असं वाटलं होतं पण आधी मिलर आणि नंतर मॉरीस ने फेह्लूक्वयो आणि रबाडा यांच्या सोबत उपयुक्त भागीदाऱ्या करत सव्वा-दोनशेचा पल्ला गाठून दिला. मधल्या षटकांच्या टप्प्यात चहल ने अप्रतिम मारा केला. फलंदाजांना त्याचे लेग्ब्रेक्स, गुगली, स्ट्रेटरवन , फ्लिपर्स ओळखणे जमत नव्हते आणि या गोंधळात केदार जाधव देखील आपली “समुद्र सपाटी खालची” चार षटके “सस्त्यात” टाकून गेला तर शेवटी भूवीच्या नावापुढे देखील ४४ धावत दोन बळी असं समाधानकारक पृथ:करण झळकलं. मॉरीस खरंच तडफेने खेळला आणि ५ बाद ८९ या अवस्थेच्या पार्श्वभूमीवर पहायला थोडा बरा (पण भारतासारख्या तगड्या संघासाठी अगदी तोकडा असा) २२७ चा पल्ला त्याने संघाला गाठून दिला.
खरं तर पहिल्या दोन सामन्यातल्या (इंग्लंड आणि बांगला देश विरुद्धच्या) धक्कादायक पराभवानंतर द. आफ्रिका जोरदार कामगिरी करेल अशी (भारतीय संघ आणि चाहते वगळता) सर्वांचीच अपेक्षा होती. पण पहिल्याच पावलावर माशी शिंकल्या सारखा टोस जिंकून फलंदाजी घेण्याचा पाफ डू प्लेसीचा निर्णय “अनाकलनीयच” वाटला. अशाने “नवनिर्माण” कसं होणार...? चांगले तेज गोलंदाज, त्यांना अनुकूल असं ढगाळ वातावरण, दोन-दोन लागोपाठच्या पराभवाने कमी झालेला आत्म:विश्वास या सगळ्या गोष्टी पाहता..त्यांनी आधी गोलंदाजी करणं कदाचित योग्य ठरलं असतं..! जे अनुमान भारतीय गोलंदाजांनी नंतर सिद्धही केलं. २२८ धावांचं अगदीच तोकडं वाटावं असं जरी लक्ष्य असलं तरी खेळपट्टीत काहीतरी जान आहे हे दिसत होतं.. रबाडा, मॉरीस, फेह्लुक्वयो हे नक्कीच त्याचा फायदा उठवू शकणारे गोलंदाज आहेत. जोडीला इम्रान ताहीर आणि शम्सी होतेच. चागली सुरवात होणं आवश्यक होतं..किंवा छोट्या छोट्या भागिदाऱ्या करत कोणा एकाने मोठ्या डावाची उभारणी करणं गरजेचं होतं. धावगतीचं तसं काही दडपण नव्हतं पण जम बसे पर्यंत सुरवातीची षटके निभावून नेणे आवश्यक होतं. पण “गब्बरला” “ठाकूर कागीसो रबाडा” ने काही कळायच्या आतच जेरबंद केलं.. आणि विराट अवतरला...! रबाडाने केलेल्या एका वक्तव्याने सर्वांना अपेक्षित असलेली रबाडा आणि विराटची लढत पहायला मिळेल अशा तयारीने सावरलेल्या प्रेक्षकांना मात्र निराशा झेलावी लागली. खेळपट्टीवर आल्यापासून चाचपडणारा विराट स्थिरावण्यापूर्वीच फेह्लुक्वयोच्या सणाणत उसळलेल्या एका चेंडूंवर, डी’कॉक ने घेतलेल्या विस्मयकारक झेलाने गारद झाला. आणि विराटचा या विश्वचषकातला पहिला डाव देवाला अर्पण झाला..!
दरम्यान च्या काळात रोहित देखील पूर्ण विश्वासाने जरी नाही तरी पाय रोवून उभा होता. रबाडाच्या गोलंदाजीवर एक दोन चौकार अन एक आत्मविश्वास वाढवणारा षटकार त्याने भिरकावला होताच. विश्वचषका सारख्या स्पर्धेतल्या पहिल्याच सामन्यात, पन्नाशीत चांगले दोन फलंदाज गारद झाल्यावर आणि समोर चांगल्या दर्जाचे गोलंदाज असताना, सव्वा दोनशेचं आव्हानही “अवजड” वाटू शकतं. त्यात चेंडू चांगलाच उसळत होता, हलत होता आणि वेगही होताच. लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अगदी जवळचा असणारा “चौथ्या जागेचा” प्रश्न, गेले काही दिवस, तमाम भारतीय क्रिकेट रसिकांच्याही चर्चेचा झाला होता...विजय की राहुल? राहुल की विजय...? या प्रश्नाचं या सामन्यापुरतं का होईना उत्तर देत विराटने राहुलला या जागेवर बसवलं...आणि त्यानेही तिसऱ्या गड्यासाठीच्या भागीदारीत रोहितसह, ८५ घावांची अतिशय मोलाची अशी भर घातली. पण आपल्या धावांची गद्धे पंचविशी गाठली अन तसेच गुण उधळून राहुल मोकळा झाला...! अतिशय संयमाने उभी केलेली भागीदारी ज्या पद्धतीने बाद होत राहुलने मोडली ते पाहता.. विराट, शास्त्रीने त्याचे कान उपटले पाहिजेत असंच वाटून गेलं.
अजूनही सामना आवाक्यात आलेला नव्हता. आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये चक्क दोन षटके निर्धाव टाकणारा मॉरीस हार मानायला तयार नव्हता. आपल्या भागीदारीत रोहित-राहुल ने इम्रान ताहीरची नेहमीची धार चांगलीच बोथट केली होती. विकेट घेतल्यावर, त्याच्या खास शैलीत, हात उंचावत आणि आरोळी ठोकत मैदानावर बेभान होत पळायची संधीच मिळाली नाही. तर तबरेझ शम्सी जाणवलाही नव्हता. आणि इथेच माझ्या मते द. आफ्रिका आणि भारतीय संघाच्या आक्रमणातला फरक ठळकपणे दिसून येत होता. पहिल्या दहा षटकानंतर मधल्या तीस षटकांच्या टप्प्यातच चहल (आणि कुलदीप) ने द. आफ्रिकेचे पाच फलंदाज फारश्या धावा न देता माघारी धाडले होते. आणि द. आफ्रिकेसाठी ताहीर आणि शम्सी मात्र १९ षटकात एकही बळी न मिळवता ११२ धावा देते झाले.
राहुल नंतर मैदानावर उतरलेल्या धोनीने, IPL मधल्या आपली कामगिरी आणि या दौऱ्याच्या सराव सामन्यातून गवसलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर, आपला डाव उभा केला.. रोहित बरोबरची त्याची ७४ धावांची भागीदारी सामना विराटच्या खिशात टाकणारी ठरावी. धोनी बाद झाला तेंव्हा केवळ औपचारिकता उरली होती...ती आपला नवीन पोस्टर बॉय पांड्या ने टकाटक दोन चौकार मारत पूर्ण केली.
या दरम्यान आपल्या लक्ष्याकडे अर्जुनाच्या एकाग्रतेने नजर ठेवत रोहित एक अप्रतिम डाव खेळून गेला...! १४४ चेंडूत काढलेल्या (१२२) या अप्रतिम शतकाचं “मोल” करणं अशक्य आहे. या डावातल्या धावांपेक्षा महत्वाचं आहे ते ज्या तऱ्हेने त्याने या डावाची उभारणी केली ती जिगरी वृत्ती...! यात साधारणपणे धावांची पन्नाशी पार केल्या नंतर शतकाची (किंवा त्याच्या सवयीप्रमाणे मोठ्या शतकाची) मजल मारताना दिसणारा त्याचा सुप्रसिद्ध “Lazy Elegance” आणि “Flamboyance” कुठेही नव्हता तर या नाबाद डावात सर्वत्र दिसत होता तो एक बुजुर्ग फलंदाज, ज्याच्या खांद्यावर भारताचा डाव वाहून नेण्याची मोठी जबाबदारी होती..आणि ती त्याने तितक्याच जिगरीने आणि यशस्वीरीत्या पूर्ण केली. क्रिकेट मधला प्रत्येक फटका रोहित शर्मा ला वश आहे.. त्याला कुठलाही स्ट्रोक मारताना कष्ट करावे लागत नाहीत इतकी नैसर्गिक सहजता...त्याच्यात ठासून भरली आहे...आणि हा गुणच बऱ्याचदा त्याचा घात करतो...या कमालीच्या दैवी फलंदाजाला ही सहजताच बऱ्याचदा दगा देते. इतक्या गुणांनी नटलेल्या रोहितच्या गालावर दृष्ट लागू नये म्हणून “सातत्याचं तीट” लावायची जबाबदारी स्वत: रोहितचीच आहे... हे त्याने ओळखावं असं मनापासून वाटतं..!
खरं तर कालची त्याची इनिंग्स, याचा प्रत्यय देणारीच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विराट अविश्वसनीय प्रकारे खेळतोय. जगभराच्या संघाच्या/खेळाडूंच्या मनात त्याची चक्क दहशत आहे... पण ज्या ज्या वेळी विराट अयशस्वी झालाय...त्या पैकी बऱ्याचवेळा रोहित ने भारताला विजय मिळवून दिला आहे. गुणवत्तेच्या बाबतीत रोहित आणि विराट नखभरच कमीजास्त असतील. पण कामगिरीच्या बाबतीत आता विराट खूप पुढे निघून गेला आहे. खरं तर २००८ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध, सचिन तेंडूलकर सोबत सव्वाशे धावांची भागीदारी करताना रोहित ने दिमाखदार ६६ धावांची खेळी केली होती. त्या खेळीने भल्याभल्या पंडितांना त्याची दखल घ्यायला भाग पाडलं होतं. तेंव्हा अगदी एकमुखाने सर्वांनीच मान्य केलं होतं की, भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर आणखी एक लखलखता तारा उगवला आहे...! योगायोगाने अगदी त्याचं दिवशी क्वालाल्लामपूर मध्ये भारताचा संघ विराटच्या नेतृत्वाखाली द. आफ्रिकेविरुद्ध, Under-19 World मध्ये विजेता ठरला होता.. या विजयानंतर विराट आणि त्याच्या सेनेने केलेला जल्लोष आजही आठवतोय. एकाच दिवशी आपल्या कामगिरीने क्रिकेट जगाचं लक्ष वेधून घेण्याऱ्या या दोघांची त्यानंतरची कारकिर्द जवळपास सोबतीनेच होत राहिली. पण विराटने ज्या प्रकारे टेस्ट, ODI आणि T-20 या तिन्ही प्रकारच्या खेळात अफाट उंची गाठली आहे तसं क्षमता असूनही रोहितच्या बाबतीत घडू शकलं नाहीये. याला कारणीभूत आहे तो सातत्याचा अभाव..! दोघाकडेही क्रिकेट जगतात प्रचंड सन्मानाने पाहिलं जातं पण रोहितचं कसोटी संघातलं स्थान आजही पक्कं नाहीये. कालच्या सामन्यात रोहितच्या खेळीत दिसली ती खास विराटची म्हणून ओळखली जाणारी खासियत...धावांचा पाठलाग करताना दिसणारी विजीगिषु वृत्ती...! जबादारी पत्करून ती पूर्ण करायची तयारी...त्यासाठी आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालण्याची तयारीच नव्हे तर तसं करून सामना जिंकून देण्याची क्षमता...! हा रोहित नवीन आहे...आणि तो खूप सुंदर आहे...! तो असाच खेळत राहो.. आणि २०११ साली भारताच्या विजयी संघात केवळ दुर्दैवाने निवड न झालेल्या रोहितचं विश्वचषक उंचावण्याचं स्वप्न यावर्षी पूर्ण होवो याच शुभेच्छा...!
मदन देशमुख, पुणे.

No comments:

Post a Comment