Wednesday, 12 June 2019

तो असाच आहे...!

तो क्रिकेट क्षितिजावर उगवला त्या दिवसांपासून आपण त्याला पाहतोय..
तो असाच आहे...!
“UNDER-19 विश्वकरंडकस्पर्धेतभारतीय संघाचं नेतृत्व करताना त्या कोवळ्या वयात देखील...
तो असाच होता...!
एकदम INTENSE, INVOLVED..! काही चुकलं तर चिडणारा, ओरडणारा, चक्क शिवीगाळ करणारा..अन मनासारखं घडलं तर..लहान मुलांसारखा उड्या मारणारा..आनंदाने बेभान होणारा...
तो असाच आहे..!
आक्रमक तर तो आधीपासूनच आहे..पण आता उर्मट वाटतो. त्याची वागणूक संघनायकाची वाटत नाही तर एखाद्याभाईची भासते. असंही काही ढुढ्ढाचार्य बोलतात. पण...
तो असाच आहे..!
मैदानावरचा त्याचा वावर, देहबोली अतिशय आवेशपूर्ण असते अन तोदबंगवाटतो...!
अगदी खरंय हे सगळं..!
तो असाच आहे..!
कारण तो धाडस, धैर्य अन कणखरतेचं जिवंत उदाहरण आहे..! माईक ब्रेअर्ली सारखा तो कागदी, व्यवस्थापकीय अन तांत्रिक कौशल्याधारीत परीटघडीचा नेता नाहीए. तर मैदानावर हातात शस्त्र घेऊन प्रत्यक्ष युद्धात भिमपराक्रम गाजवणारा लढवय्या सेनापती आहे. त्याचं मैदानावरचं केवळ अस्तित्व देखील शेवटच्या सैनिकालाही स्फुरण देतं.. कारण ते अस्तित्वच अगदी "विराट" आहे...!
तो क्रिकेट क्षितिजावर उगवला त्या दिवसांपासून आपण त्याला पाहतोय..
तो असाच आहे...!
ज्या ज्या वेळी  भारतीय संघावर बाका प्रसंग गुदरला... त्या त्या वेळी  या धिरोदात्त, धाडसी, जिद्दी आणि दिलेर सेनापतीने  आपल्या संघाची अडचणीतून सुटका केली..अगदी सुरवातीपासून..एक फलंदाज म्हणून आणि गेली काही वर्षे  तिन्ही प्रकारच्या संघाचा कर्णधार म्हणून...! खरं तर कर्तुत्वाने, गुणवत्तेने, पराक्रमाने हा  भारतीय संघाचा हा अर्जुनच..पण का कोण जाणे क्रिकेट पंडितांच्या मनात  त्याची आजवरची प्रतिमा मात्र चिडक्या, तापट, धसमुसळ्या स्वभावाच्या दुर्योधना सारखीच राहिली. इंग्लिश मध्ये "He calls Spade a Spade" असा एक वाकप्रचार आहे.. निर्भीड पणे जे जसं आहे तसं मांडणे या अर्थाने वापरला जाणारा. विराट अगदी तसाच आहे..राग आला तर तो  व्यक्त करायला मागे पुढे पाहणारा..आणि आनंद झाला तर साऱ्या जगाला ओरडून सांगणारा...! पंजाबी मुंडा है...त्यामुळे ""ची बाराखडी जराही अडखळता तोंडातून बाहेर येते. पर मुंडा दिलदार है.. जेंव्हा संघाची कामगिरी, सहकाऱ्यांची खेळी चागली होते..यश पदरात टाकते..तेंव्हा दिल खोल के कौतुक याच्या मुखी नांदत असतं...तिथेही मापात पाप नसतं..! ज्याचं श्रेय त्याला आणि ज्याचं पाप त्याच्या पदरात टाकून गडी मोकळा होतो.
तो असाच आहे...!
पण सामन्या पूर्वी आणि सामना संपल्यानंतर ज्या पद्धतीने तो त्याचा विचार मांडतो, स्वत:ला पेश करतोपत्रकार परिषदेत ज्या मुद्देसूदपणे त्याच्या प्रत्येक निर्णयाचं स्पष्टीकरण  करतो , अतिशय उत्तम आणि यथार्थ शब्दांमध्ये संवाद साधतो, वैयक्तिक टीका-टिप्पणी प्रगल्भतेने हाताळताना दिसतो... ते पाहिलं का
तो असाच  आहे...! 
२०१७ मध्ये ICC Champions Trophy च्या अंतिम सामन्यात, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ने केलेल्या आपल्या लाजिरवाण्या पराभवाच्या निमित्ताने, त्यावेळच्या कर्णधार आणि प्रशिक्षकामध्ये खदखदणाऱ्या वादाचा ज्वालामुखी फुटला होता. आठवतंय का..? “विराट” (म्हणजेच JUMBO) आणिJUMBO” (म्हणजेचविराट”) हे,  आधुनिक क्रिकेट जगतातलं भन्नाट म्हणावं असं समीकरण साधारण त्यापूर्वी वर्षभरापूर्वीचकर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकअशा भूमिकांमध्ये जुळून आलं, त्यावेळी माझ्या सारखा प्रत्येक क्रिकेट रसिक मनोमन सुखावला होता. आपल्या कारकिर्दीत एक लढवय्या आणि झुंझार खेळाडू म्हणून ज्याची क्रिकेट जगताला ओळख होतीत्या कुंबळे च्या रुपात भारतीय क्रिकेट संघाला मिळालेला प्रशिक्षक आणि आपल्या जबरदस्त आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने जगभरातल्या क्रिकेट रसिकांच्या मनात स्थानमिळवलेला विराट कोहली कर्णधारपदी....!  अशा जबरदस्त  जोडीच्या हाती संघाची  धुरा गेलेली पाहून सर्वांनीच समाधान व्यक्त केलं होतं. आणि खरं तर त्या वर्षा-दीडवर्षातली विराट च्या वीरांची मैदानावरची कामगिरीनजर लागावी अशीच होती”. १७ कसोट्यांपैकी १३ मध्ये दणदणीत विजय, मायदेशातल्या मालिकांमध्ये ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि इंग्लंड तर परदेशी वेस्ट इंडीज वर मिळवलेले विजय, या दरम्यान एक दिवसीय सामन्यांमध्ये देखील दणदणीत कामगिरी, Champions Trophy मध्ये शानदार कामगिरी करत गाठलेली अंतिम फेरी..! हे सगळंच स्वप्नवत होतं. विराट तर कर्णधार म्हणून अगदी आघाडीवर राहून संघाचं नेतृत्व करत होताच पण त्याच बरोबर एक बिनीचा खेळाडू म्हणून  आपल्या धमाकेदार अन अभूतपूर्व फलंदाजीने धावांचे डोंगरही  रचत होता. आश्चर्यकारक सातत्याने त्याने  शतकांची रासच घातली...त्यात तब्बल चार द्विशतके देखील होती..!
पण त्यांच्यातल्या वादाने, संघभावनेची चिरेबंदी इमारत बेचिराख झाली...भारतीय क्रिकेट जगताने, संघाच्या ( म्हणजे भारतीय क्रिकेट संघाच्या हो..!) कधीही पाहिलेल्या/ऐकलेल्या बाबी भर बाजारात आणून मांडल्या  गेल्या..! विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्या मध्ये गेल्या सहा महिन्यात साधी बातचीत सुद्धा होत नव्हती म्हणे, अनिल कुंबळे अतिशिस्तबद्ध आणि खत्रूड हेडमास्तरासारखा या कोवळ्या पोरांच्या राशीला लागला होता..अन त्यांना त्याने क्लास वर्क, एक्स्ट्रा क्लास, होम वर्क, इतर अभ्यास अशा आयुधांचा वापर करत जगणं नको नको केलं होतं.. विराट, युवराज, जडेजा, धवन, धोनी, रोहित या सगळ्या सुपरस्टार्स ची लोकप्रियता एका बाजूला तर अनिल मास्तर सर्वांसमोर यांना पाजत असलेले शिस्तीचे, अनुशासनाचे आणि नियमावलीचे कडवट घोट एकीकडे...! असं कुंबळे विरुद्ध बोललं गेलं. तर आधीपासूनच भडक माथ्याचा विराट आता जगभरात मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अन यशामुळे  मातलाय, मिळालेल्या कर्णधारपदाच्या अधिकाराने उतलाय.. आणि स्वत:ला खेळापेक्षा श्रेष्ठ समजायला लागलाय. मला हवाय तसा प्रशिक्षक असला पाहिजे, त्याने माझ्या सांगण्याप्रमाणे वागले पाहिजे, मी म्हणेन तीच पूर्व अशीची बाधा विराटला झाल्यामुळेच त्याचे आणि कुंबळेचे संबंध विकोपाला गेले (अन अखेर ते गंगेला देखील मिळाले...!) असं विराट बद्दल सांगितलं गेलं. याची परिणीती अखेर अनिल कुंबळेच्या गच्छंतीत झाली..कारणं विराटला गमावणे भारतीय क्रिकेट ला परवडणारे नव्हते...!
या सगळ्या पार्श्वभूमीवर विराटची प्रतिमा निर्माण झाली होती ती फारशी आनंद देणारी नव्हती. त्याच्या अफाट गुणवत्तेविषयी आणि मैदानावरच्या पराक्रमाविषयी कुणालाच शंका नव्हती. प्रश्न उभे रहात होते किंवा केले जात होते ते त्याच्या काहीश्या भडक आचरणा विषयी...!
या पार्श्वभूमीवर आपला संघ विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला पोचला तेंव्हा बऱ्याच शंका क्रिकेट रसिकांच्या मनात होत्या हे खरंच. पण तिथे गेल्या पासून पहिल्या दोन सराव सामन्यातला आणि नंतरच्या . आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांसोबत झालेल्या सामन्यात जो विराट दिसला आहे तो एकदम वेगळा दिसतोय...! हा विराट एकदम उत्फुल्ल आणि उत्साही आहे. खेळण्यातली जिगर, लढाऊ वृत्ती, जोश हे सारं तसंच आहे.. पण तो आता उकळत्या लाव्हारसा सारखा भासत नाहीये...तो कधी भडकेल अशी भिती वाटत नाहीये. उलट हसऱ्या चर्येने, खेळाचा आनंद लुटत मैदानावर वावरतोय असं जाणवतंय. मला वाटतंय याची सुरवात IPL स्पर्धेतच झाली होती..RCB या त्याच्या संघाने अगदीच गचाळ अन सुमार कामगिरी करत सुरवातीचे - सामने अगदी ओळीने गमावले...आणि त्या संघाचं त्या स्पर्धेतलं भवितव्य निश्चित झालं त्यानंतरच्या - सामन्यांमध्ये हा वेगळा विराट दिसायला लागला. आता काही गमावण्या सारखं तर राहिलं नाहीये..चला आता खेळाचा आनंद तरी लुटू या भावनेने तो नंतर खेळला. एकदम relaxed mood मध्ये दिसला...कुठल्याही दडपणा शिवाय मैदानावर वावरला. आणि आनंदाची बाब म्हणजे तोच mood, अन तीच देहबोली घेऊन तो विश्वचषक स्पर्धेसाठीही पोचला. पहिल्या दोन्ही सामन्यात ज्या पद्धतीने त्याने संघाचं नेतृत्व केलंय..त्यात आजवर दिसलेला एक शांतपणा जाणवतोय. तो मस्त हसत खेळत वावरतोय..मजा करतोय..खेळाचा आनंद लुटतोय..आणि हे करताना कुठेही casual भासत नाहीये. यामागे धोनीचं  सर्वत्र जाणवणारं अस्तिव आणि सध्या तो पार पाडत असलेली भूमिका, कर्णधारपदाच्या दडपणाचा त्यामुळे कमी झालेला भार, या काही गोष्टी आहेतच. पण त्याची जाणीव विराटला इतक्यातच झालेली दिसतेय. एका अतिशय कुशाग्र बुद्धीच्या आणि हरहुन्नरी मुलाचं शिक्षण पूर्ण व्हावं..उत्तम कारकिर्द सुरु व्हावी, यश मिळावं पण स्वभावात असलेला वांडपणा तसाच रहावा अन तो वेळोवेळी उफाळून यावा, जबाबदारीचं भान नसावं असं काहीसं झालं होतं विराटचं. पण गेल्या काही कालावधीत हा वांडपणा अचानक गळून पडावा आणि त्या बेजबाबदार मुलाचं अचानक एका जबाबदार प्रौढात व्हावं...असं काहीसं झालंय...!
आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात, फलंदाजी करताना, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ ची काही भारतीय प्रेक्षकांनी जेंव्हात्याप्रकरणावरून हुरर्यो उडवत शेरेबाजी केली तेंव्हा, विराटने जे काही केलंय ते पाहून सारं क्रिकेट जगात वेडावलंय..नव्याने विराटच्या प्रेमात पडलंय...! त्यावर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फार छान विचार मांडला त्याने. झाल्या चुकांची जाणीव असणाऱ्यांना, त्याची शिक्षा भोगालेल्यांना क्षमा करणं आणि पुन्हा एक संधी देणं, माणूसपण जपणं.. आलं पाहिजे असं म्हणत तो म्हणाला कीमाझ्या बाबतीत असं झालं असतं तर मी हे कदापी सहन करू शकलो नसतो. मी मला स्वत:ला स्मिथच्या जागी ठेऊन पाहिलं..त्यामुळे मला ते अयोग्य वाटलं. अस्वीकारार्ह वाटलं”.  स्वत: स्मिथ ने तात्काळ मैदानावरच त्याचे आभार मानले...तर मैदानाबाहेरचं सारं क्रिकेटविश्व विराटच्या या प्रगल्भ आचरणाने जणू स्तिमित झालंय...!

तो असाच आहे...!


मदन देशमुख, पुणे

1 comment:

  1. खरंच तो तसाच आहे. आणि तीच त्याची खासियत आहे.....
    एकदम यथार्थ....

    ReplyDelete