Monday, 8 July 2019

चहाची वेळ...!

माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की सकाळच्या पहिल्या चहाच्या वेळी जो वेळ नवरा-बायको एकमेकांसोबत घालवतात तोच सर्वोत्तम असतो. नव्या दिवसाच्या तयारीला इथे सुरवात होते.. नव्या स्वप्नांचा या गप्पांमध्ये जन्म होतो.. हाती असलेल्या कामांना मार्गी लावण्याच्या योजना ठरतात.. मनातलं काही उघड होतं.. एखादी मागणी समोर येतं अन क्वचित काही नाराजी सुद्धा वाफाळत समोर येते..!
रोजच्या धावपळीला लागणारी उर्जा अन उमेद देतो हा पहिला चहा अन त्यासोबत घोटाघोटाने मारलेल्या या गप्पा देतात एक उर्मी ..!
संध्याकाळच्या चहाची चव... आपला दिवस कसा होता यावर अवलंबून असते.. मनासारखी कामं पार पडली असतील तरी किंवा फार काही समाधानकारक घडलं नसेल तरी... मन आणि शरीर थोडं थकलेलं असतं.. दिवसभरातल्या पळापळीने..!  जोडीदार  सुद्धा आपापल्या कामात गुंतलेले असतात... त्यांचाही दिवस असाच आनंद किंवा निराशा देऊन गेलेला असतो.  त्यामुळे संध्याकाळचा चहा फार यांत्रिक पणे घेतला जातो.
रोज घरातल्या ठरलेल्या ठिकाणी, सकाळच्या चहाचे घुटके घेत घेत एकमेकांसोबत घालवलेले क्षण खूप काही देत असतात. सोबत.. आधार.. हुरूप.. उत्साह.. असं बरंच काही..!
दिवस बदलतात तसे हातातले कप आणि त्यावरची नक्षी बदलत जाते...या चहाची लज्जत कायम रहाते.. इतकच नाही तर ती छान मुरत जाते..! न सांगता एका मनीचे दुसऱ्या मनी पोहचू शकते. कधी कधी असही होतं... की कोणालातरी एकट्यालाच प्यावे लागतात हे घोट... एखाद्या दिवशी किंवा काही काळ सोबत नसते.. मग चुकल्या चुकल्यासारखं वाटतं.. चवच जाते... चहाची अन मनाची सुद्धा..! कधी कधी सोबतच असतो आपण... पण काही तरी बिनसतं... आचार आणि विचारांचं प्रमाणच बिघडतं.. अन रोजचाच चहा.. पण एकदम बेचव लागतो... समोर असूनही सोबत नसतो..!
पण फार काळ नाही रहात हे चित्र... चहाच्या तजेलदार सुवासात अन  सकाळच्या वातावरणात मनातलं मळभ हटतं... सारं काही ताजंतवानं होतं..वाफाळलेल्या ताज्या रसरशीत चहासारखेच..सहवासातले क्षणही धुंदावतात! पण केंव्हातरी तो क्षण सुद्धा येतो...
चहा एकट्यानेच प्यावा लागतो... सोबत गमावलेला.. चव हरवलेला.. कोणा दुसऱ्यानेच करून दिलेला.. बेचव चहा..!
कधी जागा बदलतात... दिवस पालटतात.. चव हरवते... कारण सोबत ही हरवलेली असते ..! चहाचा तो ताजा गुलाबी रंग.. आणि ती मनाच्या जिव्हेवर पसरलेली अवीट गोडी... पुन्हा म्हणून कधी भेटत नाही...!
म्हणून सोबत आहोत तोवर त्या क्षणांचे घोट मनापासून घ्या..!

मदन देशमुख, पुणे.

Sunday, 7 July 2019

लसिथ मलिंगा... एक वेगळंच प्रकरण..!

विश्वचषकात भारताकडून शेवटच्या साखळी सामन्यात पराभव झाल्यानंतर लसीथ मलिंगा ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली.. आणि श्रीलंकेच्या क्रिकेट विश्वातला एक अध्याय संपला असंच म्हणावं लागेल..! याॅर्कर वर अफाट प्रभुत्व असणारा.. आणि मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये आपल्या या कौशल्याचा हुकमी वापर करत... प्रचंड यश मिळवणारा हा गोलंदाज वेगळाच होता. याची स्वतःची एक वेगळीच शैली होती. मध्यमगती/किंवा जलद गोलंदाजी करण्यासाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या सर्व बाबी धाब्यावर बसवणारी जगावेगळी शैली..!

खरं तर जलदगती गोलंदाजी साठी अगदी आदर्श अशी शैली प्रत्येक गोलंदाजांची असतेच असंही नाही. पण काही नावं यासाठी अगदी आवर्जून घेतली जातात.. ज्यांना जलदगती गोलंदाजीतली "रोल्स राॅईस" म्हटलं जायचं असे मायकेल होल्डिंग, ज्यांची Delivery Action पहातच रहावं असे रिचर्ड हॅडली.. डेनिस लिली... अॅलन डोनाल्ड, ब्रेट ली... आपला कपिल देव.. मनोज प्रभाकर.. एस. श्रीशांत... या सर्व गोलंदाजांची शैली आठवून पहा बरं जरा... काय डोळ्यासमोर येतं....? तर दिसते ती बाॅलिंग मार्क पासूनची त्यांची लयबद्ध धाव.. क्रिझच्या जवळ येताना वाढत गेलेला वेग... क्रिझचा यथायोग्य उपयोग करत.. कधी क्रिझच्या कडेने किंवा स्टंप्सच्या जवळून टाकलेला चेंडू... तो टाकताना guiding hand म्हणजे डाव्या हाताची perfect position, कानाच्या अगदी जवळून येणारा उजवा हात, मनगटाची perfect position, चेंडू सोडताना जसा चेंडू टाकायचा आहे त्यासाठी आवश्यक अशी मनगटाची केलेली हालचाल... त्यामुळे हातातून सुटलेल्या चेडूंची, Perfect Seam Position आणि हे सारं करताना... उर्वरित शरिराचा सुयोग्य वापर.. नंतरचा फॉलो-थ्रू...! हे सगळं एखाद्या नृत्याविष्कारा पेक्षा किंचीतही कमी नसायचं.. आठवलं..? हे सारे गोलंदाज ही नैसर्गिक शैली घेऊनच मैदानावर आले असावेत.

मला तर साऊथ आफ्रिके विरूद्ध श्रीशांत ने एकदा सहा बळी घेत भारताला विजय मिळवून दिला होता.. तेंव्हा त्याच्या गोलंदाजीत, जी अफलातून Seam Position पहायला मिळाली होती ती आजही आठवतेय..! सरळसोट सीम वर भिरभिरत जाणारा चेंडू सीम वर टप्पा खात एखाद्या नागासारखा फुत्कारत उसळतो अन झsssप्पकन  बाहेर निघतो... ते दृश्य अद्भूत असतं... त्या गोलंदाजाला अपाsssर समाधान देणारं..! होल्डिंग, रिचर्डस, ब्रेट ली, डोनाल्ड, कपिल, श्रीशांतचे आऊट स्विंगर्स, मनोज प्रभाकर चे इन-स्विंगर्स.. आठवून पहा. हे सगळे उत्कृष्ट "बॉलिंग अ‍ॅक्शन" चे धनी होते. मनोज प्रभाकर तर बाॅल टाकताना कमरेपासून वरच्या भागाचा एक arch करायचा आणि त्याचा उजवा हात डोक्याच्या अगदी मागून यायचा... आणि अपसूकच सीम वर पडून चेंडू हातभर आत यायचा.. आणि अशातच त्याला चेंडू बाहेर काढायची ही कला अवगत होती. त्याच्या काळातला एक उत्कृष्ट स्वींग गोलंदाज म्हणून आजही प्रभाकरचं नाव घेतलं जातं. केवळ सुंदर बोलिंग अ‍ॅक्शन आणि मनगटाच्या बळावर दोन्ही बाजूला चेंडू सीम आणि कट करू शकणाऱ्या कपिलने झंझावाती वेग नसतानाही मिळवलेलं घवघवीत यश तर साऱ्या जगाने पाहिलंय.

पण.. यासोबतच.. इतरही गोलंदाजांनी, भले ते आदर्श शैलीचे धनी नसतीलही, पण आपल्या कामगिरीने तमाम क्रिकेट रसिकांच्या हृदयात मानाचं स्थान पटकावलेलं आहे. साऊथ आफ्रिकेचा पाॅल अडॅम्स, पाकिस्तानचा सोहेल तन्वीर हे गोलंदाज खूप यशस्वी नसतीलही, पण त्यांच्या खरोखरीच्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळेच आजही लक्षात आहेत.

आणि या सगळ्यात जगावेगळी श्टाईल होती ती.. लसिथ मलिंगाची..! केवळ वेगळी शैली नाही तर त्या शैलीवर थक्क करणारं नियंत्रण ठेवत जगभरातल्या फलंदाजांच्या मनात धाक आणि जरब निर्माण करण्यातही हा हसतमुख खेळाडू यशस्वी ठरला.  गोलंदाजी पेक्षा ही "गोफण"बाजी वाटावी अशा "राऊंड आर्म अ‍ॅक्शन" ने गोलंदाजी करताना, आडव्या हाताने हा नेमकं स्टंप्सच्या रेषेत बॉल कसा टाकू शकायचा हे, तो बाॅलिंगला प्रारंभ करताना चेंडू पायाजवळ ठेवून, ज्या देवाला मनोभावे नमस्कार करायचा, तो देवच सांगू शकेल..! तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करायचा त्या परिस्थितीत यॉर्कर सारख्या, जमला तर फलंदाजाची खेळी उध्वस्त करू शकणारा आणि चुकला तर गोलंदाजाची कानशीलं लाल करणारा, चेंडू तो कशा काय अचूक टाकायचा कोणास ठाऊक..! याच्या जोडीला.. "स्लोअर वन" किंवा "स्लोअर बाऊन्सर" ही फसवी अस्त्रं ही तो त्याच सफाईने आणि अचूक टाकायचा. मला वाटतंय की, मलिंगाच्या प्रशिक्षकाने, अगदी सुरवातीला जेंव्हा जलद गोलंदाजाच्या अ‍ॅक्शन विषयी धडे दिले असतील.. तेंव्हा "आपला उजवा हात कानाच्या अगदी जवळून आला पाहीजे" असंच सांगितलं असेल पण... (कदाचित कानावरच्या केसांमुळे) मलिंगा ने ऐकताना गफलत केली असावी.. आणि "आपला उजवा हात अंपायरच्या कानाजवळून आला पाहीजे" असं ऐकलं असावं. अन त्यामुळेच ही "गोफण"बाजीची शैली त्याने घोटवली असेल. गंमतीचा भाग वेगळा... पण अनेक वर्षे आपल्या या वेगळ्या शैलीने जगभरातल्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडवणारा "स्लिंगा... मलिंगा" अखेर निवृत्त झालाय. श्रीलंकेच्या गेल्या काही वर्षांतल्या यशात, एक गोलंदाज म्हणून मलिंगाचं योगदान खूप मोठं आहे... आणि एक गोलंदाज म्हणून त्याने केलेली सेवा.. क्रिकेट रसिकांच्या स्मरणात राहणारी अशीच आहे..! त्याला त्याच्या उर्वरित आयुष्यातल्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!

मदन देशमुख, पुणे.

Saturday, 29 June 2019

अंपायरिंग... एक पंच(नामा)..!

सध्या चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत, पंचगिरी करणाऱ्यांच्या यादीत, भारताच्या एकमेव पंचाचा समावेश आहे.. ते म्हणजे श्री. एस रवि. हे सद्गृहस्थ तेच आहेत ज्यांच्या नजरेतून, आयपीएल स्पर्धेत (MI vs RCB)  ऐन मोक्याच्या क्षणी, मलिंगाचा भला मोठा No Ball, सुटला होता. आणि मोठा गहजब उडाला होता.. पण यांच्या सदोष पंचगिरीवर काही कारवाई झाली नव्हती. ICC च्या "Elite Pannel", सांप्रत हे एकमेव भारतीय पंच आहेत. एके काळी चार-पाच भारतीय पंच या यादीत असायचे..! या घसरणीचं काय कारण असावं बरं?

माझा एका मित्राने पंचगिरीच्या परिक्षा दिल्या आहेत. त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक म्हणजे शहर पातळीवर, जिल्हा आणि राज्यस्तरीय आणि अखेर आंतरराष्ट्रीय पंच म्हणून पंचगिरी करणं (त्यासाठी असणाऱ्या विवीध परिक्षा, विविध स्तरीय प्रत्यक्ष सामन्यांमध्ये पंचगिरी, कार्यशाळा, व्याख्याने, mock drill इ. इ. आवश्यक बाबी पुर्ण करत ती अहर्ता मिळवणं, त्यात चांगली, उत्तम  कामगिरी करून नाव कमावणं)  हे एखाद्या क्रिकेट पटूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्द घडवण्या सारखंच कष्टाचं, जिकीरीचं आणि कठीण काम आहे. कौशल्य, एकाग्रता, काही प्रमाणात शारीरिक तंदुरुस्ती (विशेषतः डोळे आणि कानाची कार्यक्षमता) या सगळ्या गोष्टी पंचगिरी करताना अतिशय महत्वाच्या ठरतात. एका विशिष्ट पातळीनंतर इथे निवडीसाठी स्पर्धा असणारच. त्यातल्या गुणवत्ते सोबतच राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्यासाठी इतरही अनेक बाबी गुंतलेल्या असणारच हे सुज्ञास सांगणे नलगे..!  हा माझा, हा तुझा, हा पुण्याचा, हा बाहेरचा, मग हा महाराष्ट्राचा, हा बंगालचा, हे समिकरण जसं जिल्हा पातळी पासून ते राज्य पातळीपर्यंत होणाऱ्या खेळाडूंच्या निवडीत वापरलं गेलेलं दिसतं... तसंच पंचगिरीच्या क्षेत्रातही ही असली डोंगराएवढी आव्हाने, या क्षेत्रातल्या लोकांसमोर असतात. आज बदललेल्या परिस्थितीत आणि अतिक्रिकेट च्या जमान्यात होणारे सामने त्यांची संख्या पाहता (विशेषतः अतिझटपट सामने लक्षात घेता), त्यात पुरस्कर्ते म्हणून उभे रहाणाऱ्या छोट्यामोठ्या कंपन्या, उद्योगी, व्यापारी यांची संख्या पाहता पंचांची सुद्धा मोठी गरज निर्माण झाली आहे. जवळपास प्रत्येक शहरात असे T—20 लीग सामने आता होतात. त्याची लोकप्रियता पाहता राज्य संघटनेकडून त्यावर नियंत्रण ठेवलं जात. पंच देखील अधिकृत म्हणजे जिल्हा क्रिकेट संघटनेचेच असणं बंधनकारक आहे. अशा वेळी चांगल्या उमेदवारांना या संधी देताना अपरिहार्यपणे, कधी चोरपावलाने तरी कधी "डंके की चोट पे", राजकारण प्रवेश करतं. राज्य संघटनांना विविध प्रशिक्षण कार्यक्रम, योजना राबवण्यासाठी भरपूर निधी, आर्थिक अनुदान आता भारतीय नियामक मंडळ देतं आहे. त्यातला "आपला वाटा" मिळवायच्या अहमहमिकेत अनेक लाजिरवाण्या घटना जिल्हा  आणि राज्य संघटनांमध्ये घडतात. तीन - चार वर्षांपूर्वी गोवा क्रिकेट संघटनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात झालेली अटक हे याचंच उदाहरण..! असा अपहार झाल्यानंतर ज्या साठी ते अनुदान मिळतं त्या योजना कशा पुर्ण होतील? खेळाडू आणि पंच कसे तयार होतील? खेळाडूंच्या बाबतीत एकवेळ त्यांची कामगिरी मदत करेलच. पण पंचांच्या बाबतीत असं कधी काही ऐकू देखील येत नाही. एखादा पंच जो पर्यंत ICC च्या Elite Pannel मध्ये येत नाही तो पर्यंत आपल्याला माहितीही नसतो. भारतातल्या प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये कोण पंच असतात हेच माहिती नसतं तर त्या बरा कोण, वाईट कोणा आणि उत्तम कोण हे माहिती असणाऱ्याला "अंडं आधी की कोंबडी" या प्रश्नाचं उत्तर देखील माहिती असेल..! एखाद्या सामन्यात 150/200  च्या strike rate ने 20 चेंडूत 30-40 धावा काढणाऱ्या फलंदाजाचं कोण कौतुक होतं. तसंच काहीसं गोलंदाजांचं होतं... किवा एखाद्याने घेतलेल्या अफलातून झेलाचं..! (आजकाल असे झेल Powered By, Presented by and Sponsored by.... अशा धर्तीवर collaboration मध्ये घेतले जातात) आणि आपणही त्याचं कवन गात रहातो. पण त्याच सामन्यात पायचीत किंवा स्टंप्स च्या मागे, बॅटची अगदी बारीक कड घेऊन गेलेल्या झेलाच्या बाबतीत घेतल्या गेलेल्या अचूक निर्णयाच्या बाबतीत पंचाचं कधी कौतुक होताना दिसत नाही. उलटपक्षी एखादा निर्णय चुकल्यासारखं वाटलं किंवा दुर्देवाने तो चुकलाच तर मात्र त्याक्षणी पंचाचे वाभाडे काढले जातात. आता तर रेफरल सिस्टीम मुळे, पंचाचा निर्णय लगेच परीक्षा नळीत टाकून रासायनिक परीक्षण केल्यासारखं तपासलं जातं.. अन सिद्धता अन साध्य क्षणार्धात समोर मांडलं जातं. तो निर्णय बरोबर ठरला तर तेवढ्यापुरती चर्चा (झाली तर) होते. पण दुर्दैवाने जर तो चुकला तर संजय मांजरेकर सारखे खऊट शेंगदाणे दिवसभर बारीककुचाळ्यागत चिमटे काढत रहातात. एकूण मांडायचंय इतकंच की, Umpiring is a thankless job hounded by all but appreciated by none...! पंचगिरी हे क्रिकेट क्षेत्रातलं, एक अतिशय कौशल्याचं, अतिव श्रमाचं आणि तितकंच महत्वाचं काम असूनही त्याला योग्य आणि आवश्यक ते महत्व दिलं जात नाही. क्रिकेटपटूंना जेव्हा आता खेळून काही फायदा नाही अशी खात्री पटते तेंव्हा खेळताना मिळालेल्या अनुभवाच्या बळावर ते पंचगिरी करायला लागतात. याबाबतीत थोडी गंभीर झालेली मंडळी मग परिक्षा वगैरे देऊन पुढे जातात आणि सगळंच नीटपणे होत गेलं तर कुठेतरी पोचण्यात यशस्वी होतात. निवृत्त आंतरराष्ट्रीय खेळाडूंना इकडे वळणं बरंच सोपं जातं. त्यांची एक ओळखदेखील असतेच पण दबदबा सुद्धा मदतीला येतो. त्यांना वर उल्लेखलेल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं नाही. त्यामुळे त्यांची दुसरी इनिंग सुद्धा (कधी कधी पहिल्या पेक्षा जास्त) यशस्वी होते. व्यंकटराघवन, कुमार धर्मसेना, पाॅल रायफेल ही काही चांगली उदाहरणं आपल्या समोर आहेतच. प्रत्यक्ष पंचगिरी  करतानाचे अनुभव, अडचणी हा एक वेगळाच विषय आहे.  जमल्यास पुन्हा कधीतरी त्यावर लिहीनच..!

(सहज सुचलं म्हणून लिहीलं)
मदन देशमुख, पुणे.

Saturday, 22 June 2019

त्रिमीतीय... ओझं..!

त्रिमितीय... ओझं..!

केवळ फलंदाजीच्या गुणवत्तेवर भारताच्या विश्वचषक स्पर्धेतल्या संघात चौथ्या नंबरवर खेळण्यासाठी निवड व्हावी असं या तथाकथित त्रिमीतीच्या खेळाडूकडे काहीही नाहीए. अहो फार मोठी मोठी आणि कानाला हात लावूनच घ्यावीत अशी नावं या "चौथ्या" क्रमांकावर खेळलेली आहेत.. मानकरीच ठरावीत अशी..! तिथे हे सुमार दर्जाचे उपटसुंभ कसे सहन व्हावेत..? बरं.. निवड समितीच्या अध्यक्षांनी याच्या निवडीचं समर्थन करताना हा "3D" खेळाडू असल्याचा शोध लावला होता. आणि हा शोध अगदी अभिमानाने मिरवला होता. पण या "त्रिमिती" खेळाडूची, पहीली "मिती" फलंदाजीच्या वेळी स्लो विकेटवर कशी फाकली ते दिसलं... क्षेत्ररक्षणाची दुसरी मिती इतकी भारी की याच्या अंगावर अफगाणिस्तानचे फलंदाज एक तिथे दोन-दोन धावा काढत होते.. आणि कधीही नाराजी उघडपणे व्यक्त न करणारा विकेटकीपर धोनी... हताश होऊन हातवारे करत होता. डीप कव्हर्स मध्ये उडालेला एक झेल घेण्यासाठी पाॅइंट वरचा राहुल (30 यार्ड सर्कल पासून) मागे धावत होता तर ही त्रिमिती सीमारेषेवरून पुढे...! पण याने कॉल देऊन झेल घेण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी.. तो मागे पळणाऱ्या राहुल साठी सोडला.. आणि त्यानेही तो सोडलाच.. कारण तो त्याचा नव्हे तर याचाच झेल होता. इतका पराक्रम पाहून अष्टपैलू खेळाडू म्हणून वर्णी लागलेल्या या बहाद्दराची तिसरी म्हणजे गोलंदाजीची "मिती", विराटने (अत्यंतिक भितीने) वापरलीच नाही. ज्याला क्षेत्ररक्षणात "लपवावं" अशी परिस्थिती आहे... ज्याच्याकडे अटीतटीच्या सामन्यात विश्वासाने गोलंदाजी सोपवावी असं कर्णधाराला वाटत नाही... आणि फलंदाजीतही जो फाफललेलाच असतो.. तो आपला चौथ्या नंबरवर खेळतोय.. हे आता "सांगताही येत नाहीए... आणि सहनही होत नाहीए..!"
हा जेवढे रन्स काढतो.. तेवढे तर रविंद्र जडेजा, बारावा खेळाडू म्हणून जितका वेळ क्षेत्ररक्षण करतो.. तितक्या वेळात अडवतो.. वेळ पडेल तेंव्हा फलंदाजीही करू शकतो... आणि "त्रिमिती" पेक्षा कैक पटीने अधिक चांगला आणि परिणामकारक गोलंदाज आहे... हे वेगळं सांगायची गरज नाही. जरी आपण सध्या चांगले खेळतोय आणि जिंकत असलो तरी.. संघासमोर असलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे.. असं वाटतंय. गुणवान खेळाडू बाहेर ठेऊन ही "व्याह्याचं घोडं" सांभाळणं.. आतबट्ट्याचं वाटतंय. त्यामुळे हे घोडं... तबेल्यातच बांधावं आणि परिस्थितीनुसार भूवी किंवा जडेजा (कदाचित कुलदीप ऐवजी आणि) त्रिमीती ऐवजी दिनेश कार्तिकला संघात आणावं.. असं माझं मत आहे..! तुम्हाला काय वाटतंय..?

मदन देशमुख, पुणे.

Friday, 21 June 2019

रेडियो कॉमेंट्री.. एक हृद्य आठवण..!

जेंव्हा टिव्ही नव्हते.. रेडिओ वरची "रनिंग काॅमेनटरी" हा एकमेव पर्याय होता त्या काळात आद्य समालोचकांपैकी एक कै. जसदेव सिंग, सुशील दोशी (हिंदी) तर अनंत सेटलवाड, सुरेश सरैय्या, प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी (इंग्रजी) तर काही प्रमाणात बाळ ज. पंडीत, बाळ करमरकर आणि वि. वि. करमरकर (मराठी) या समालोचकांनी आपापल्या भाषेतून समालोचन करत, क्रिकेट रसिकांच्या दोन पिढ्यांची भूक भागवली आहे. यातल्या प्रत्येकाची स्वतःची अशी विशिष्ठ शैली होती... खास अंदाज होता. "बोलर की जोsssरदार अपिsssल... लेकीन ये उत्साह में जादा.. विश्वास में कम..." असं म्हणताना श्वासात आरोह-अवरोह आणणारे सुशील दोशी, ऐकणाऱ्याचे प्राण कंठाशी आणायचे. जसदेव सिंग आणि समालोचन या खरंतर एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. हा या क्षेत्रातला खरा अवलिया म्हणायला हवा. यांनी क्रिकेट, हॉकी, फुटबॉलच नव्हे तर आॅलिंपिक्स, हॉकी वर्ल्ड कप्स, एशियाड, नॅशनल गेम्स असं प्रत्येकामध्ये समालोचन तर केलंच पण त्याशिवाय... १५ आॅगस्ट, २६ जानेवारीचे दिल्लीतले खास सोहळे ही गाजवले आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय महत्वाच्या नेत्यांच्या, व्यक्तींच्या अंतयात्रांच्याही समालोचनाची जबाबदारी अनेक दशकं त्यांनी अतिशय यशस्वीरीत्या पार पाडली. तर इंदोरचे थोड्याशा High Peach Tone असलेले सुरेश सरैय्या अतिशय रसाळ इंग्रजीत म्हणी, वाक्प्रचार वापरत रंगत वाढवायचे. अंनत सेटलवाड, प्रा. नाडकर्णी यांचा भरदार आवाज आणि खर्जातले उच्चार मन व्यापून टाकायचे. बाळ पंडितांनी ही मराठी समालोचक म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळवली होती..
"पुढचा चेंडू.. चांगल्या टप्प्यावरचा.. फलंदाज पाय पुढे टाकत मारण्याच्या प्रयत्नात.. पण तो हुकतोय.. पॅडवर बसतोय.. दाद मागण्यात आली आहे.. पण फलंदाज नाबाद..!" असं अगदी ओघवत्या शैलीत त्यांचं समालोचन असायचं. रेडिओ वर समालोचन असल्याने, साहजिकच खेळाच्या समालोचना सोबतच स्टेडियमवर असलेला माहौल ही वर्णनात असायचा. तिथलं दृश्य आपल्या शब्दांमधून ही मंडळी उभं करायची. फार मजा यायची... हे ऐकताना. आॅस्ट्रेलिया दौरा असला की, पहाटे तीनला उठून रेडिओला कान लावून बसायचं.. सुरवातीला खूप खरखर असायची.. मग हळूहळू आवाज स्पष्ट होत जायचा... आणि सुख मिळायचं. १९७७-७८ च्या आपल्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबोर्न कसोटीत पिटर टूही नावाच्या फलंदाजाचा, मदनलाल ने डीप फाईन लेग ला जवळजवळ तीस यार्ड्स धावत जाऊन घेतलेल्या झेलाचं जे वर्णन सुशील दोशींनी केलं होतं.. ते आजही मनात ताजं आहे...! अगदी डोळ्यासमोर घडल्यासारखं मी ते ऐकलं नाही तर.. पाहिलं होतं..! फार सुंदर काळ होता.. रेडिओ वरच्या काॅमेंट्रीचा..!

किती जणांच्या आठवणीत आहे हे..?

मदन देशमुख, पुणे.

Saturday, 15 June 2019

बाप... नावाचा वटवृक्ष..!

आज अधोरेखित होतंय...
(केवळ) स्त्री क्षणभराची बायको...
आणि जन्मभराची आई नसते...!
तर पुरूष (देखील) वटपौर्णिमेपुरता नवरा...
आणि जन्मभराचा बाप असतो...!

घरदार गणगोत मागे सोडून...
त्याच्यासवे सप्तपदी घालणाऱ्या
त्या सावित्रीचा, हा सत्यवान...
खरंतर पिता होतो...!
 

अन आपल्या लेकीच्या कन्यादानाने...
हा नवकोट नारायण...
एकदम रिता होतो..!

फार विलक्षण योग आहे आज...!
वटपौर्णिमा आणि पितृदिन एकाच दिवशी आहेत.

या दोन विशेष दिनांची संस्कृती आणि पार्श्वभूमी जरी भिन्न असली तरी, पुरुषांच्या आयुष्यातल्या दोन भूमिकांप्रती आदरभाव व्यक्त करणारे हे प्रसंग एकाच दिवशी यावेत हे खचितच खास..!

भावना न दाखवता... आनंदाच्या प्रसंगी आपल्या हर्षाचा भुईनळा न उडू देणं, पुरुषांची खासीयत मानली जाते...!

तर दुःख, वेदना, संकटांना सामोरं जाताना याच्या सहनशिलतेची कसोटी लागते...!

अशावेळी याच्या डोळ्यांना झरताही येत नाही...!
अन बायका पोरांच्या, आधारासाठी त्याच्यावर खिळलेल्या
डोळ्यांना, नजरेआड करताही येत नाही..!

पण...जेंव्हा आई, बहिण, बायको, मुलं
आणि इतरेजन, त्या त्या वेळी
कधी याच्या पाठीशी तर कधी सोबत उभे रहातात....!
तेंव्हा मात्र याच्या मनावर रोमांच उभे रहातात..!

तसेच रोमांच आज माझ्या मनावर उभे राहिले आहेत..!

(सहज सुचलं म्हणून लिहीलं)
मदन देशमुख, पुणे.

Thursday, 13 June 2019

"टल्ली"राम उवाच..!

"एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही की,
दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र कोण करत असेल???
नाल्या जवळ असो...
प्रवेश दक्षिण दिशेला असो...
समोर खड्डा असो...
वा लाइटीचा ट्रांसफाॅर्मर असो...
किंवा आणखी काही वास्तु दोष असो...
दुकानात गर्दी नेहमीच असते आणि
सैराट धंदा होत असतो.."

असं म्हणतात की,
जिथे शास्त्र संपते..!
तिथे श्रद्धा प्रकटते..!
"दारूचं दुकान किंवा अड्डा" देखील असंच एक श्रद्धास्थान आहे. प्रचंड प्रमाणात सकारात्मक उर्जा तिथे अनेक मार्गाने आणि विवीध प्रकारे एकवटलेली दिसते...!  मन आनंदाचं भरतं आलेलं  असो की दुःखाच्या गर्तेत बुडालेलं... पण जिथे पोचल्यावर, सकारात्मक उर्जेने ते मन सोड्यासारखंच फसफसतं ते ठिकाण म्हणजे "दारूचं दुकान"..!

इथे माझ्या मनाची घालमेल संपणार आहे या खात्रीनेच माणूस जिथे पोचतो.. ते म्हणजे "दारूचं दुकान"...!

तिथे आलेली माणसं,  एकतर मनात असलेली सगळी दुःखं, वेदना, शल्ये मनातून हद्दपार करायच्या हेतुने आलेली असतात, किंवा वाट्याला आलेला आनंद, सुख, समाधान द्विगुणित करण्यासाठी आलेली असतात. दोन्ही मनःस्थितीतल्या माणसांना आपलंसं वाटणारं स्थान म्हणजे "दारुचं दुकान"...!

एकदा का, या ठिकाणी मिळणारं ते मोक्षप्राप्ती कडे नेऊ शकेल असा विश्वास ज्या विषयी वाटावा असं,  "तिर्थ" घेतलं आणि थोडा चकणा "प्रसाद" म्हणून चाखायला लागलं की परमात्म्याशी थेट संवाद साधू शकतात काही आत्मे..! भवतालच्या भौतिक जगापासून, इथल्या क्षणभंगुर सुख-दुःखाच्या भिंती आणि बंधने झुगारून देत त्या "टल्लीन“ झालेल्या आत्म्यास, पारलौकिक तिर्थाटन आणि दर्शन घडवणारे "तिर्थ"स्थान असतं.. "दारूचं दुकान"...!

आपला तो मित्र असतोच, पण शत्रू देखील जिथे मित्र होऊ शकतो असं रणांगण नव्हे तर "मित्रत्वाचं आंगण" असतं.. "दारुचं दुकान"...!

"तुझं ते तुझंच... पण माझं ते सुद्धा तुझंच" असं विलक्षण परोपकारी भान आणि निर्लेप वृत्ती माणसाच्या मनात निर्माण करू शकणारं स्थान.. म्हणजे "दारूचं दुकान"...!
मोक्ष.. मोक्ष.. म्हणतात तो यापेक्षा काय वेगळा असतो....?
आणि हे सगळं जिथे एकवटलेलं असतं अशा स्थानी कुठला आलाय दोष...?

एका "टल्लीरामाचं"  मनोगत...
🍻🍻🍷🍷🍸🍸🍸🍷🍷🍻🍻
😝😝😝😝😜😜😜😝😝😝😝

(सहज सुचलं म्हणून लिहीलं)
मदन देशमुख, पुणे.