Monday, 10 June 2019

शिकार... कांगारूंची..!

गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाने आपल्या अप्रतिम आणि सातत्यपूर्ण कामगिरीने एक दबदबा निर्माण करत सगळ्याच परदेशी संघांना मागे ढकलून आघाडी मिळवली आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलिया सोबतची आपली कामगिरी एकूणात जबरदस्त अशीच ठरलीय. काही “इतर प्रासंगिक” घटनांमुळे या दोन संघामध्ये असलेली श्रेष्ठत्वाची लढाई फारच तीव्र झाली आहे. पण ती खेळाला मारक नाही तर कारक ठरली आहे.. हे देखील आवर्जून म्हणावं लागेल. कारणं या दोन संघांच्या लढतीत पहायला मिळतो तो जबरदस्त आणि एका वेगळ्याच उंचीचा खेळ, खेळातली गुणवत्ता आणि मानसिक धैर्य यांची खरी कसोटी लागते ती या दोन संघात. आणि लढत जर विश्वचषकातली असेल तर त्याचं महत्व आणि परिणामकारकता अधिकच वाढते. तीच लढत काल झाली आणि काय जबरदस्त मुकाबला झाला...!  विराटसेनेने यात मिळवलेला विजय अनेक अंगाने मन:पूत समाधान देणारा ठरला.

नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने अतिशय योजनाबद्धरित्या आपला डाव उभा केला. स्टार्क, कमिन्स, कुल्टरनाईल आणि अॅडम झाम्पा या चार मुख्य गोलंदाजासह स्टॉईनीस व मॅक्सवेल या अष्टपैलूंचा मारा, नक्कीच आज जगातल्या उत्तम आक्रमणापैकी एक आहे. मागच्याच सामन्यात पाच बळींचा पराक्रम करणारा स्टार्क हा तर सध्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच तोलामोलाचा कमिन्स.. आणि वेस्ट इंडीज सोबतच्या नाट्यपूर्ण लढतीत आपल्या गोलंदाजीने नव्हे तर फलंदाजीने कांगारूंचा तारणहार ठरलेला कुल्टरनाईल तसे आत्मविश्वासाने फुरफुरत होतेच. जोडीला गुणवान फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा आणि अष्टपैलू मार्कस स्टॉइनीस.

पण रोहित आणि धवन च्या जोडीने अगदी सावध सुरुवात केली. मागच्या सामन्यात ठोकलेल्या शतकाने दिलेल्या आत्मविश्वासाने रोहित भक्कम वाटत होता तर धवन देखील एक चांगली खेळी उभारण्याच्या तयारीत होता. या स्पर्धेपूर्वी ही जोडी तशी फारशी फॉर्ममध्ये दिसत नव्हती. पण सराव सामन्यातल्या चांगल्या कामगिरीने रोहितला फॉर्म गवसला होता. धवन हा “बिग टूर्नामेंट प्लेयर” आहे, खास करून “ICC च्या टूर्नामेंट” मध्ये गब्बर हमखास चमकतो. अन त्याचाच प्रत्यय या सामन्यात आला.

कितीही वेळा पारायणं केलेली असली तरी... पुन्हा शोले पाहताना आपण वाट पहात असतो ती गब्बरची..! त्याशिवाय शोले खऱ्या अर्थाने रंगतच नाही. जाड-जड अशा रासवट बुटांचा, आणि हातातल्या चामडी पट्ट्याचा खडकावर घासून आवाज झाला की, आपण सरसावून बसतो. या विश्वचषकाच्या शोले मध्ये, पहिल्या दोन सराव सामन्यात दोन आकडी धावसंख्याही न गाठणाऱ्या गब्बरची सणसणीत एन्ट्री काल झाली. अर्थात तो या शोलेमध्ये खलनायक नाहीए... तर नायक ठरलाय..!

या दोघांनी अतिशय सावध अशी सुरुवात केली. आधी गोलंदाजीतली धार बोथट करत पहिल्या ७ षटकात फक्त २२ काढणाऱ्या या जोडीने नंतर प्रतिआक्रमण करत अतिशय भक्कम अशी शतकी भागीदारी फळ्यावर लावली ती १९ व्या षटकात. त्या दरम्यान कमिन्स एक चेंडू जोरात धवन च्या हातावर आपटून त्याला इजाही झाली पण तरीही नेटाने त्याने प्रतिहल्ला करत रोहित सोबत १२७ धावांची सलामी दिली.. खेळपट्टी तशी सोपी नव्हती..."दुहेरी वेगाची" वाटत होती. चेंडू टप्पा पडून चांगला कट होत होता..किंवा कधी अचानक उसळतही होता. कुल्टरनाईलच्या अशाच एका उसळत्या चेंडूवर रोहित चकला आणि यष्टीमागे झेल देऊन तंबूत परतला तो त्याच्या वैयक्तिक ५७ धावांवर. त्याजागी आलेल्या कर्णधार विराटनेही लवकरच जम बसवला आणि दुसऱ्या गड्यासाठी धवन सोबत त्याने ९२ धावांची भागीदारी करतानाच संघाचे द्विशतकही फळ्यावर लावले. या दरम्यान धवनने हात जायबंदी असतानाही १०९ चेंडूत ११७ धावांची भक्कम खेळी उभी केली होती. हे त्याचं विश्वचषकातले तिसरे शतक...! या खेळीत ज्या तडफेने आणि मुख्य म्हणजे परिस्थिती प्रमाणे खेळात बदल करत धवनने कालचा डाव सजवला ते विराटला आणि तमाम भारतीयांना फार फार आनंद देणारं ठरलं.
धवनच्या जागी आलेला फलंदाज पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं असेल. खूप चर्चा झालेल्या या "चौथ्या सीटवर" अचानक हार्दिक पांड्या येऊन बसला. आणि काय टर्नअराऊंड झाला पांड्याच्या त्या खेळीने...! २७ चेंडूत धडाकेबाज ४८ धावांची ही खेळी किती महत्वाची होती ते जय-पराजयातल्या ३६ धावांच्या फरकाने अधोरेखीत केली. पांड्याच्या खेळात विशेषतः फलंदाजी अन क्षेत्ररक्षणात एक खास झिंग आहे... जी त्याला बरीचशी वेस्ट इंडियन खेळाडूच्या देहबोलीशी जोडते. दिसायला सडपातळ असणाऱ्या या सळसळत्या पोरामध्ये लोखंडी कांबीसारखी लवचिकता अन काठिण्य आहे हे त्याचे फटके पाहिले की समजतं.  लेगस्टंपवरचे चेंडू लिलया प्रेक्षकात भिरकावून देताना त्याला जरा ही सायास पडत नाहीत. अचानक प्रतिस्पर्ध्यांचा गोटात हत्ती शिरल्यासारखी दाणादाण उडवून देतो पठ्ठ्या..! कालची त्याची खेळी अगदी अशीच, कांगारूंची तंबू भूईसपाट करणारी ठरली.

पण याच पांड्याला त्याने खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक केरीने दिलेलं जीवदान कांगारूना भलतंच भारी पडलं. पांड्याने आणलेल्या वावटळीत, भारतासाठी ५५ चेंडूतच ८१ धावांची लूट झाली आणि "अब की बार तीन सौ पार" चा नारा घुमला. शेवटी धोनी आणि राहुल च्या हाणामारीत भारताचं धावांचं गलबत NDA सारखंच थेट ३५२ चा आकडा गाठतं झाल. दरम्यान गलबताच्या कप्तानाने ८२ धावांची एक धिरोदात्त खेळी उभारली होती. आता हा सामना जिंकण्यासाठी कांगारूना विश्वचषकाच्या इतिहासाला हरवावं लागणार होतं, कारण आजवर पाठलाग करत कुठल्याही संघाने विजय मिळवताना गाठलेलं सर्वाधिक लक्ष्य होतं ३२९ धावांचं.

कांगारूंच्या डावाची सुरुवातही धिमीच झाली. भुवी-भूमरा च्या जोडीने चांगल्या टप्प्यावर आणि अचूक मारा केला. आणि मुख्य म्हणजे दोन्ही सलामीवीरांनी जखडून ठेवलं. दोघेही प्रयत्न करत होते पण त्यांना हात मोकळे सोडता आले नाहीत. ज्याच्या फलंदाजीवर त्यांची भिस्त असते त्या डेव्हिड वॉर्नरची अवस्था "सांगता येईना अन सहनही होईना" अशी भासत होती. खरंतर भुमराच्या पहिल्याच षटकातला पहिलाच चेंडू तटवताना वॉर्नरच्या बॅटला लागून यष्ट्यांवर जाऊन लागलाही होता पण "खुदा मेहरबान" होता.. त्याने या "पेहलवानाच्या" बेल्स पडू दिल्या नाहीत..! त्यावेळी खरं तर ओव्हल मैदानावर उपस्थित, निळ्या जर्सी मधल्या भारतीय पाठीराख्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असेल..! भारताच्या डावावर तळपणारा भास्कर, कांगारूंच्या डावात मात्र दाटून आलेल्या ढगाआड दडला. त्याचाही थोडाबहुत फायदा भारतीय गोलंदाजांना मिळाला. अखेर अॅरोन फिंच, केदार जाधवच्या चपळाईमुळे आणि अचूक फेकीमुळे, अचानक धावबाद झाला तेंव्हा कांगारूंनी नुकतीच साठी ओलांडली होती. त्याच्या जागी आलेल्या स्मिथने वाॅर्नर सोबत डाव पुढे नेला खरा पण आवश्यक तो विश्वास मात्र दोघांच्याही खेळीत दिसत नव्हता त्यामुळे asking rate वाढत चालला होता. अखेर ८४ चेंडूत ५४ धावा करून वॉर्नर, चहल च्या माऱ्यावर झेलबाद झाला तेंव्हा त्याने स्वतःही निश्वास सोडल्यासारखं वाटलं..! स्मिथ च्या जोडीला आलेल्या उस्मान ख्वाजा ने, त्याला साथ दिली खरी.. पण धावगती रोखण्यात भारतीय गोलंदाज बाजी मारत होते.

३५३ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यक, "खास" असं काही घडत नव्हतं. ते घडवण्यासाठी ख्वाजाने (त्याच्या) उजव्या यष्टीच्या बाहेर सरकत भुमराला स्क्वेअर लेगला भिरकावण्याचा केलेला धाडसी प्रयत्न.. फारच पोरकट ठरला. खरं तर... अंगलटच आला अन चेंडू त्याच्या यष्ट्यां उध्वस्त करून गेला, तेंव्हा कांगारूंनी नुकतेच द्विशतक गाठलं होतं.  त्यानंतर आलेल्या मॅक्सवेलने आपल्या शैलीत फटाफट काही फटके मारले.. झटपट २८ धावा चोपल्या अन बायकोला लवकर घरी यायचं आश्वासन दिलेल्या नवऱ्याच्या घाई-गडबडीत रवाना ही झाला.

तरीही अजून पुढे काय होईल याचा अंदाज करणं कठीण होतं... कारण स्मिथ जरा स्थिरावल्या सारखा वाटत होता आणि नंतर येणारा स्टॉईनिस हा किती धोकादायक आणि मोठे फटके मारणारा फलंदाज आहे हे भारताने आस्ट्रेलिया (आणि नंतर कांगारूंच्या भारत) दौऱ्यात चांगलंच अनुभवलं होतं. तसं तर खेळपट्टीत काही जान नव्हतीच. पण भारतीय गोलंदाजांचा मारा त्याही परिस्थितीत नियंत्रित होता. मात्र कुलदीप यादवने जरी धावा त्यामानाने कमी दिलेल्या असल्या तरी तो अगदीच निष्प्रभ ठरला. आता कांगारूंनाच धावा करणं जमलं नाही.. त्याला त्याचाही नाईलाज झाला...! पांड्याने चक्क दहा षटकांचा कोटा, फारशा धावा न देता पुर्ण केला.

आणि या महत्वाच्या टप्प्यात विराटने आपल्या "जय-वीरूच्या" हातात पुन्हा एकदा आक्रमणाची सुत्रे सोपवली. आणि सामना फिरला तो इथेच...! भुवी ने आपल्या एकाच षटकात स्थिरावलेला स्मिथचा आणि स्थिरावण्यापुर्वीच स्टॉईनिस चा काटा काढला. पाठोपाठ भूमराने वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ६० चेंडूत ९२ धावा बुकलून काढणाऱ्या कुल्टरनाईलला आणि पॅट कमिन्स ला झटपट गुंडाळलं. पण या दरम्यान यष्टीरक्षक अलेक्स केरी एका बाजूने, पांड्याला दिलेल्या जीवदानाची भरपाई करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. भिडू जिगरबाज आहे. छोट्या चणीच्या या खेळाडूने आपल्या ऋषभ पंतची आठवण करुन दिली. त्याचे काही फटके खरंच अचाट होते. अखेर ५५ धावा काढून नाबाद राहीलेल्या या खेळाडूला...आपल्या चुकीचं ओझं आणखी काही दिवस मनावर वहावं लागेल. ३५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त ३६ धावा कमी पडल्या असं जरी धावफलक दाखवत असला तरी, भारताची या सामन्यावरची पकड कधीच सुटली नव्हती. आणि अतिशय योजनाबद्ध आणि व्यावसायिक रितीने, विराट सेनेने आस्ट्रेलिया विरूद्धचा हा सामना खिशात घातला हेच आमच्या मनावर कोरलंय.
आता प्रतिक्षा १३ तारखेची... आणखी एका विजयाची...!

मदन देशमुख, पुणे.

8 comments:

  1. Good. Nice way to reach out to more and more people. Keep it up.

    ReplyDelete
  2. Awesome MD.. श्रीगणेशा तुफान झालाय

    ReplyDelete
  3. संजयच्या कुरुक्षेत्रावरील आँखो देखा हाल प्रमाणेच हा सामना डोळसांसमोर पुन्हा उभा केलास. Gr8

    ReplyDelete